खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा धुमाकूळ थांबायला तयार नाही. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात शनिवारी भर दुपारी भारत पेट्रोलियम पंपासमोर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका कुख्यात गुंडाचा भाऊ गणेश काळे (वय ३६, रा. येवलेवाडी) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडामुळे कोंढवा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळे (वय अंदाजे ३५-३६) हा रिक्षातून खडीमशीन येथून येवलेवाडीकडे जात असताना, भर पावसात दुपारी अज्ञात चार इसमांनी दुचाकीवरून येऊन त्याच्यावर हल्ला केला.
हल्लेखोरांनी गणेश काळे याच्यावर सलग सहा गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने वार केल्याचीही माहिती आहे. खुन झालेला गणेश काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे (दत्ता काळे) याचा सख्खा भाऊ आहे. समीर काळे हा सोमा गायकवाड टोळीचा सदस्य असून सध्या कारागृहात आहे. काही महिन्यांपूर्वी वनराज आंदेकर याची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. त्यानंतर गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याचाही गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आयुष कोमकर हा आंदेकर टोळीशी संबंधित होता. आंदेकर टोळीच्या सूडाच्या राजकारणातून (गॅंगवॉर) ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. वनराज आंदेकरच्या हत्येचा सूत्रधार सोमनाथ गायकवाड आणि त्याचा साथीदार समीर काळे यांच्यावर आंदेकर टोळीचे बारीक लक्ष होते.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यासह कोंढवा पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकल्यामुळे पुणे पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.






