खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ने (Anti-Extortion Cell-2) अत्यंत प्रभावी आणि जोखमीची कारवाई करत, ‘मोका’ (MCOCA) कायद्याखाली पाहिजे असलेला आणि एका सराईत टोळीचा सदस्य असलेल्या आरोपीला अटक केली आहे. दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराला मोठा धक्का बसला आहे.
खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण आणि पोलीस उप-निरीक्षक गौरव देव यांच्या नेतृत्वाखालील पथक पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत होते. याच दरम्यान, पोलीस अंमलदार अमोल घावटे यांना गोपनीय माहिती मिळाली की, राधिका मसाला शॉपसमोर सार्वजनिक रोडवर एक संशयित इसम थांबला आहे. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी पाहणी केली असता, पाठीवर सॅक अडकवून उभा असलेला एक इसम दिसला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने शिताफीने त्याला रात्री ०३:१० वाजता ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव मुसाब ईलाही शेख (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असल्याचे समजले.
अधिक तपासणीत खुलासा झाला की, ताब्यात घेतलेला आरोपी मुताब ईलाही शेख हा कुख्यात निलेश घागवाळे टोळीचा सदस्य आहे आणि तो कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या MCOCA (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) च्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी होता. या आरोपीकडे बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवलेला ८७८ ग्रॅम गांजा (किंमत ₹१८,२६०/-) देखील आढळून आला, तो जप्त करण्यात आला आहे. त्याने हा गांजा त्याचा मित्र तेजस पूनमचंद डांगी (वय ३३, रा. मानाजीनगर, नऱ्हे) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. त्यानुसार, पोलिसांनी तातडीने दुसऱ्या आरोपीलाही त्याच्या पत्त्यावरून ताब्यात घेतले. आरोपी मुताब शेखवर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दरोडा, शस्त्रास्त्र आणि मोका अंतर्गत यापूर्वीच चार गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी तेजस डांगीवर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये दोन एनडीपीएस ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत.
पुणे पोलीस दलाने अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत, रात्री उशिरा केलेली ही धडाकेबाज कारवाई गुन्हेगारांमध्ये कायद्याची दहशत निर्माण करणारी आहे. विशेषतः मोका आणि अंमली पदार्थांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी खंडणी विरोधी पथक-२ च्या पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव आणि अंमलदारांनी दाखवलेली ही कर्तव्यनिष्ठा आणि व्यावसायिकता अत्यंत प्रशंसनीय आहे. मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली असून, पुणे पोलीस दल शहरातून संघटित गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या कारवाईतून सिद्ध झाले आहे. आरोपींविरुद्ध सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना आज दिनांक १६/१०/२०२५ रोजी कोथरूड पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये (MCOCA) अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे.






