खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या येरवडा पोलीस स्टेशनने (Yerwada Police Station) एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद कामगिरी बजावत, सहा महिन्यांपासून फरार असलेल्या ‘मोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम – MCOCA) कायद्याखाली गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला जेरबंद केले आहे. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १८३/२०२५ नुसार, भा.न्या.सं.क. ३५१, आर्म्स ॲक्ट (Arms Act), म.पो.अधि. व मोका कायद्यातील गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. सदर आरोपीला त्वरित ताब्यात घेण्याबाबत वरिष्ठांचे निर्देश होते, त्यानुसार येरवडा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान, पोलीस अंमलदार नटराज सुतार आणि अक्षय शिंदे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, संबंधित आरोपी ताडीगुत्ता, येरवडा परिसरात येणार आहे. ही बातमी मिळताच तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक प्रदीप सुर्वे व नमूद अंमलदार यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना, अंमलदारांनी त्याला करण खंडोबा कुंभार (वय २४, रा. इराणी मार्केट, गाडीतळ, येरवडा) असे नाव असलेल्या या आरोपीस शिताफीने पकडून ताब्यात घेतले. या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या टीमने दाखवलेली ही तत्परता आणि अचूक नियोजन पुणे पोलीस दलाची गुन्हेगारी नियंत्रणावरील कठोर पकड दर्शवते, ज्यामुळे संघटित गुन्हेगारांनाही कायद्यापासून दूर राहणे अशक्य होते.
सदरची यशस्वी कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. सोमनाथ मुंडे आणि मा. सहा. पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र शेळके आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक महेश फटांगरे व पोलीस उप-निरीक्षक प्रदीप सुर्वे तसेच अंमलदार शिंदे, कोकणे, वाबळे, जागभाग, सोगे, कांबळे, सुतार, जाधव, अडकमोळ, गायकवाड आणि निलख यांनी विशेष परिश्रम घेतले. गुन्हेगारीवर वचक ठेवणाऱ्या पुणे पोलिसांच्या या प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये कायद्याप्रती विश्वास अधिक दृढ होतो. सदर गुन्ह्याचा अधिक तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे या करीत आहेत.






