खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे: पुणे शहरात रात्रीच्या वेळी नागरिक सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित करणारी एक घटना गुलटेकडी परिसरात घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलाजवळ, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी एका व्यक्तीला धारदार शस्त्राने जीवे मारण्याची धमकी देऊन, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे लुटल्याची घटना १० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०:५० वाजताच्या सुमारास घडली.
असा घडला दरोडा
या प्रकरणातील ५० वर्षीय फिर्यादी (रा. गुलटेकडी) हे आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. ते गुलटेकडी येथील साळोबा पार्कजवळ असलेल्या सुंदरजी गॅरेज गल्लीमध्ये आले असता, मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांची दुचाकी फिर्यादीच्या दुचाकीसमोर आडवी लावली.चोरट्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर त्यांनी फिर्यादीला धारदार हत्याराचा धाक दाखवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. धक्काबुक्की करून, आरोपींनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकिटातून ₹३,०००/- रोख रक्कम, बँकेचे कार्ड आणि गाडीची चावी जबरदस्तीने चोरून नेली.
स्वारगेट पोलिसांकडून गुन्हा दाखल
या घटनेनंतर फिर्यादींनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. २७४/२०२५ अन्वये भा.न्या.सं. कलम ३०९(४) (जबरी चोरी), ३५१(२), ३५१(३), ३(५) सह आर्म्स ॲक्ट कलम ४(२५) आणि म.पो.का. कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात दोन अनोळखी मोटारसायकलस्वार आरोपी आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक स्मिता पाटील या करत आहेत.स्वारगेट पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी त्वरित तपास पथके तैनात केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांचे आवाहन: नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी आणि अशी घटना घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.






