खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे: पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी कात्रज परिसरात घडलेल्या एका खुनाच्या (Murder) घटनेचा भारतीय विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police) अवघ्या १२ तासांत छडा लावला आहे. गुजर-निंबाळकर वाडी येथे कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवून, पोलिसांनी मयताच्या मित्रालाच अटक केली आहे.
असा लागला खुनाचा छडा
दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी गुजर-निंबाळकर वाडी, कात्रज येथे गवतामध्ये एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपास सुरू असताना, मृतदेह सद्दाम उर्फ सलमान शेख (वय ३५ ते ४०, रा. गुजर निंबाळकर वाडी) याचा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी गु.र.नं. ४६४/२०२५, भा.न्या.सं.क. १०३(१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला.
मित्रानेच केला घात
तपास पथकातील अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी आणि अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना, गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. मयत सलमान शेख याचा मित्र विक्रम चैथा रोतिगा (वय ३२, रा. सनबनगर, कात्रज) यानेच त्याची हत्या केल्याचे उघड झाले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि आरोपी विक्रम रोतिगा याला गुजरवाडी परिसरातून दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक केली. खुनाचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
यशस्वी कामगिरी
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप आयुक्त श्री. मिलींद मोहिते आणि मा. स.हा. पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. व.पो.नि. राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार स.हा.पो.नि. समीर शेंडे आणि पो.उप-नि. निलेश मोकाशी यांच्यासह पोलीस अंमलदार सागर बोरगे, सागर कोंडे, सचिन सरपाले, विठ्ठल चिपाडे, सौरभ वाघदंडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आग्रे, मितेश चोरमोले आणि अभिनव चौधरी यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
पुढील तपास स.हा.पो.नि. शेंडे हे करीत आहेत.






