कॅम्प-फॅशन स्ट्रीट परिसरात गोळीबार……पूर्व वैमनस्याच्या रागात झाडली गोळी….!
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ऑनलाइन :-: पुण्यातील प्रचलित कॅम्प, फॅशन स्ट्रीट परिसरात मंगळवार (दि. १३ जून) रोजी रात्री ८:३० च्या सुमारास गोळीबार (Firing) केल्याची घटना घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट (Fashion Street) या भागात एका तरूणाने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली गेली तत्काळ या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले. या गोळीबारात जखमी असलेल्या तरुणाचे नाव तौफिक अख्तर शेख (वय ४५, रा. भीमपुरा, लष्कर) असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. जुल्फीकार शेख नावाच्या व्यक्ती विरुद्ध रात्री उशिरा लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौफिक शेख हा पूर्वी फॅशन स्ट्रीट संस्थेमध्ये सेक्रेटरी म्हणून कार्यरत होता व जुल्फीकार शेख याचे फॅशन स्ट्रीट परिसरात व्यवसाय असून मागील काही महिन्यांपासून तौफिक व जुल्फीकार यांच्यात काही कारणाने वाद सुरू आहेत. त्यानंतर मंगळवारी (दि. १३ जून) रात्री साडे आठच्या सुमारास तौफिक फॅशन स्ट्रीटच्या मागील बाजूस असलेल्या ए. बी. सी. फर्म जवळील रिक्षा स्टँड परिसरातील बाकड्यावर बसला असताना जुल्फीकार तेथे आला, त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून त्याने तौफिकवर गोळीबार केला, ज्यात तौफिक च्या कमरेतून गोळी आरपार झाली. गोळीबाराच्या या घटनेनंतर फॅशन स्ट्रीट परिसरातील नागरिक व व्यावसायिकांमध्ये भीती पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी घटनास्थळी दाखल झाले, या घटनेतील संशयित आरोपी जुल्फीकारला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना केली गेली असून पुढील तपास सुरू आहे.